सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असताना, नगरपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी जिल्ह्याचा मीडिया जणू दोन राजेंच्या प्रचारयंत्रणेत रूपांतरित झाल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय. सध्या सातारा शहरातील बहुतांश माध्यमांनी “दोन्ही राजे मिळून सत्तेत येणार का, की समोरासमोर लढणार?” या चर्चेभोवतीच संपूर्ण फोकस केंद्रीत केला आहे.
पण या चर्चेच्या आड एक मोठा राजकीय खेळ सुरू आहे — दोघांपैकी कोणीही जिंकलं तरी फायदा महायुतीचाच होणार, हे माध्यमांना चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीप्रणीत गटाचा उल्लेखही आता बातम्यांमधून जवळपास गायब झालेला दिसतो. मीडिया चर्चेचं केंद्रबिंदू ठरवतेय — “राजे विरुद्ध राजे”, पण या स्पर्धेत प्रत्यक्षात कोण हरतोय तर तो विरोधी गट.
आचारसंहितेला काहीच दिवस शिल्लक असताना, नगराध्यक्ष पदासाठी दोन्ही राजे एकत्र बसून निर्णय घेणार असल्याचं माध्यमांमधून प्रसारित झालं. यामुळे “साताऱ्यात तिसरा कोणताही दावेदार नाही” अशी भावना लोकांच्या मनात निर्माण करण्यात माध्यमांना पूर्ण यश आलं आहे.
जिल्ह्यातील काही माध्यमांनी राजे गटाच्या प्रचाराला स्पष्टपणे गती दिली आहे. बातम्या, मुलाखती, पोस्टर्स आणि सोशल कव्हरेज या सगळ्या मार्गांनी ‘राजे गटच पुढे’ असा संदेश देण्यात येतोय. साताऱ्याची नगरपरिषद निवडणूक आता केवळ लोकशाही प्रक्रिया न राहता ‘फिक्स मॅच’प्रमाणे रंगवली जात आहे.
पण वस्तुस्थिती अशी आहे की, राजे गटाविरुद्ध लढणारा एक सक्षम गट — महाविकास आघाडीप्रणीत संघटना — आधीपासूनच तयारीत आहे. या गटाची जनाधारावर आधारित रणनीती आणि स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची चळवळ माध्यमांच्या प्रकाशझोतातून दूर ठेवली गेली आहे. सोयीस्कर पद्धतीने या गटाला कोणतंही ‘स्पेस’ न देणं, ही आजच्या साताऱ्यातील मीडियाची नवीन रणनीती ठरली आहे.
राजे गटाचं वर्चस्व आणि मीडियाचं निखळ समर्थन पाहता, ही निवडणूक आता लोकशाहीपेक्षा प्रचारशक्ती आणि माध्यमांवरील पकड कोणाची जास्त, याची स्पर्धा बनली आहे. परंतु जनतेत एक विचार हळूहळू पसरतोय — जर माध्यमांनी निष्पक्ष भूमिका स्वीकारली आणि राजे गटाच्या पक्षपाती बातम्या थांबवल्या तर परिस्थिती वेगळी असू शकते. “राजे गट सुद्धा पडू शकतो, आणि इतर गटांचा नगराध्यक्षही होऊ शकतो” — असा विश्वास आता काही सामान्य सातारकरांच्या मनात डोकावत आहे.
सातारा हे संघटनात्मक दृष्ट्या सक्रिय आणि प्रश्न विचारणारे जिल्हा आहे. पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि शहरी विकास यांसारख्या मुद्द्यांनीच येथे खरे बदल घडवून आणायचे आहेत. माध्यमे जर त्यांच्या कव्हरेजमध्ये या मुद्द्यांना स्थान दिले आणि नागरिकांनी जागरूकता दाखवून प्रश्न विचारले, तर नक्कीच साताऱ्याचे पुढील राजकीय अध्याय अधिक पारदर्शक, स्पर्धात्मक आणि लोकहितकारक होऊ शकतील.