नुकत्याच झालेल्या मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने उमेदवारी अर्ज माघार घेतलेल्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका प्रा. तेजस्विनी कदम यांनी आज नवनिर्वाचित नगराध्यक्षा सुनंदा अवताडे यांची नगरपालिकेत भेट घेऊन त्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या.
आज नगरपालिकेच्या दालनात नगराध्यक्षा सुनंदा अवताडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विविध संस्था व नागरिकांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. याच वेळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका प्रा. तेजस्विनी कदम यांनीही नगराध्यक्षा अवताडे यांचा सत्कार केला. या प्रसंगी नगरसेवक सोमनाथ माळी, सीमा बुरजे, सोमनाथ बुरजे, अश्पाक काझी, रवींद्र काशीद यांच्यासह संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
नगरपालिकेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर अनेक महिला इच्छुक पुढे आल्या होत्या. त्यामध्ये प्रा. तेजस्विनी कदम या भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील होत्या. यासंदर्भात त्यांनी आमदार समाधान आवताडे यांच्या संपर्क कार्यालयात मुलाखतही दिली होती. मात्र पक्षाने ऐनवेळी प्रा. सुप्रिया जगताप यांची उमेदवारी निश्चित केल्यानंतर प्रा. कदम यांनी नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेला अपक्ष व भाजप समर्थित उमेदवारी अर्ज माघार घेत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती.
त्यामुळे तिरंगी लढत झाली असून, या लढतीत सुनंदा अवताडे या 212 मतांनी विजयी झाल्या. दरम्यान, प्रा. कदम यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर त्या आपले राजकीय वजन कोणाच्या पारड्यात टाकणार, याबाबत शहरात उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र शेवटपर्यंत हा सस्पेन्स कायम राहिला होता. आज झालेल्या सत्कारावरून प्रा. तेजस्विनी कदम यांनी अप्रत्यक्षपणे नगराध्यक्षा सुनंदा अवताडे यांना पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी संधी देताना आघाडीच्या विजयासाठी झटलेल्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये आता कोणाला संधी मिळते, याबाबत शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.