युरोपला लंडनमध्ये पसार झालेल्या गुंड निलेश घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी बनावट नावाचा आणि बनावट पत्त्याचा उपयोग केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी आणि नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलिसही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आश्चर्य म्हणजे पासपोर्ट मिळवण्यासाठी निलेश घायवळने दिलेल्या नगरमधील पत्त्यावर तो राहत नसल्याचं समजल्यावरही त्याला तात्काळ स्वरूपाचा पासपोर्ट देण्यात आला. याच पासपोर्टचा उपयोग करुन घायवळ 90 दिवसांचा व्हिजा मिळवून युरोपच्या टूरवर गेलाय.
सर्वसामान्यांना पासपोर्ट देताना कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करणाऱ्या पासपोर्ट कार्यालयाला आणि नगर पोलिसांना गुंड निलेश घायवळचे कॅरेक्टर मात्र खटकले नाही. घायवळवर हत्या, अपहरण, खंडणी, शस्त्रांचा वापर असे अनेक गंभीर गुन्हे नोंद असताना देखील पासपोर्ट मिळवण्यात घायवळ यशस्वी ठरला. पासपोर्टसाठी पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यलयाकडे घायवळने 23 डिसेंबर 2019 रोजी अर्ज केला. मात्र आर्जवर पुण्यातील नाही तर अहिल्यानगरचा पत्ता असल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे. टेक्स्ट इन गौरी घुमटानंदी बाजार, कोतवाली, माळीवाडा रोड 414001 हा पत्ता त्याने पासपोर्टसाठी दिला आहे. हा पासपोर्ट मिळवण्यासाठी घायवळने नाव देखील बनावट वापरलं. त्यासाठी आडनावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केला. Ghaywal या नावातील h काढून टाकले आणि Gaywal असं केलं आहे. आश्चर्य म्हणजे पुढील 5 वर्षे याचा पोलिसांना आणि पासपोर्ट कार्यालयाला थांगपत्ता देखील लागला नाही हे विशेष. मात्र, आता पोलीस तपासाला गती आली आहे.
पुणे पोलिसांनी 10 बँक अकाऊंट फ्रिज केली आहेत आणि त्यातून 38 लाख रुपये जप्त केले. कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि त्याच्या कुटुंबीयांवर पोलिस व आर्थिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. फ्रिज करण्यात आलेली अकाउंट्स शुभांगी सचिन घायवळ, स्वाती निलेश घायवळ, कुसुम घायवळ, निलेश घायवळ (2 वेगवेगळे खाते) आणि सचिन घायवळ यांच्या नावावर आहेत. ही खाती विविध बँकांमध्ये असून त्यामध्ये जमा असलेले सर्व पैसे आता वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.