चार वेद, अठरा पुराण आणि सहा शास्त्र शिकण्याचा अधिकारी हा केवळ मानवाचा नसून प्राण्यांनाही याचा अधिकार परमेश्वराने दिला आहे, याचाच प्रत्यय अध्यात्मनगरी पंढरपूर येथे येत असून गांधी रोड येथील श्री गुंडां महाराज मठात श्रीमद् भागवत कथा ऐकण्यासाठी चक्क गाय येत आहे.
ही गाय ३ ते ४ तास एकाच जागेवर बसून असते, ती कुणालाही त्रास देत नाही, आणि पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असा गजर झाल्यावरच उठते, कधी मायेने श्री सिद्धरस गुंडा नारायण महाराज यांना प्रेमाने चाटते, महाराज देखील त्या गायीला प्रेमाने थोपटतात. हे अद्भूत दृश्य पाहून अनेक भाविक चाट पडत आहेत.
सध्या चातुर्मास सुरू असल्याने या मठात विविध धार्मिक उपक्रम सुरू आहेत, सकाळी वेदांताचा वृत्ती प्रभाकर रहस्य पाठ सुरू असतो तेव्हा पण ही गाय शांत चित्ताने श्रवण करत असते, सायंकाळी अध्यात्म रामायण सुरू असतानाही म्हणजे दिवसातून कधी वेळ मिळेल तेव्हा ती येते.
यंदाच्या वर्षी गुंडां महाराज मठात २४६ वा चातुर्मास साजरा होत आहे. त्याच बरोबर सायंकाळी अध्यात्म रामायण पाठ ही सुरू आहे.