वारकरी संप्रदायात जेष्ठ संत म्हणून श्रीसंत सावता महाराज यांचा अधिकार मोठा आहे. आपल्या भक्तीच्या जोरावर साक्षात भगवंताला भेटीसाठी आपल्याकडे यायला लावले हि त्यांची ताकद सर्वांना त्यांच्या चरित्रातून ज्ञात आहे. मात्र या गोष्टीला जोडून दुर्देवाने गेली अनेक वर्षे… जाणीवपुर्वक का अजाणतेपणाने माहित नाही पण एक मोठा अपप्रचार केला जातोय, गैरसमज पसरवला जातोय, अनेक जणांनी तशी पत्रके काढली आहेत….कि देव त्यांच्या कडे आले पण….श्रीसंत सावता महाराज कधीच पंढरपुरला आले नाहीत..! हे पुर्णतः असत्य आहे! सावता महाराज यांनी कर्मे ईशू भजावा । हा आदर्श डोळ्यासमोर ठेवला मात्र ते कधीच पंढरपूरला गेले नाहीत हे मात्र सत्य नाही. श्रीसंत सावता महाराज हे पंढरपूरच्या वारीला जात होते एवढेच काय पंढरपुरच्या वारीचा जो नियम आहे,
चंद्रभागे स्नान।विधी तो हरिकथा ।।
हे हि पाळत होते. या प्रसंगाचे लेखन सावता महाराजांचे समकालीन व वारकरी संप्रदायाचे आद्य इतिहास लेखक म्हणून ज्यांना संप्रदायात स्थान आहे असे स्वतः श्रीसंत नामदेव महाराज सांगतात.
निवृत्ती ज्ञानदेव सोपान सावता।
नामयाची कथा ऐकताती ।।
वारकरी संप्रदाय हा कोणत्याही चित्रपटातील कथेला किंवा कोणाच्या मतप्रणालीनुसार चालत नाही तर तो संतवाङमयाच्या प्रमाणावर चालतो. स्वतः नामदेव महाराज जर सावता महाराज त्यांच्या किर्तनात बसून हरिकथा ऐकत होते हे सांगत असतील आणखी कोणत्याही पुराव्यांची आवश्यकता शिल्लक रहात नाही. व यातही आनंदाची गोष्ट म्हणजे नुकतेच श्रीसंत नामदेवरायांचा वाळवंटात ज्याठिकाणी फड होता ज्या ठिकाणी ते किर्तन करत होते.
‘पुंडलिका पाशी नामा उभा किर्तनासी।।’
या प्रमाणानुसार एका जुन्या संग्रहित भावचित्राचे पुनः प्रसिद्धीकरण श्रीसंत नामदेवरायांचे विद्यमान वंशज मंडळी तथा फडाच्या वतीने त्यांनी केले आहे यात सावता महाराज या किर्तनात असल्याचे निर्देशन केलेले आहे. ज्ञानोबाराय -नामदेवराय – तुकोबाराय यांच्या पश्चात ज्यांनी हा वारकरी संप्रदाय जतन आणि संवर्धन केला अशा वंशज व फडपरंपरेच्या अधिकारी मंडळींनीही यावर आता स्वच्छ प्रकाश टाकला आहे. त्यामुळे किमान यापुढे तरी वारकरी संप्रदाय अभ्यासक,किर्तन प्रवचन कार, भाविक भक्त व सकल सश्रद्ध लोकांनी तथा श्रीसंत सावता महाराज भक्त परिवारानेही याची नोंद घेऊन यापुढे सावता महाराज कधीच पंढरपूरला आले नव्हते हा अपप्रचार थांबबावा हिच प्रार्थना आज श्रीसंत सावता महाराजांच्या समाधी सोहळ्या निमित्त करत आहोत.
धन्य ते अरण रत्नाची खाण।
जन्मला निधान सावतां तो ।।
धन्य त्याची माता धन्य त्याचा ।