आषाढी – भाविकांसाठी 27 जून पासून 24 तास दर्शन व्यवस्था 


पंढरपुर प्रतिनिधी –

  • यात्रा कालावधीत भाविकांना मुबलक सोई सुविधा.

  • मंदिर जतन व संवर्धनाची कामे अंतिम टप्प्यात.

 

  • टोकन दर्शन प्रणालीची 15 जूनला प्रथम चाचणी.

 

 

पंढरपूर दि.08 जून :- आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. या आषाढी यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना मंदिर समिती मार्फत मुबलक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच भाविकांचे सुलभ व जलद दर्शन व्हावे यासाठी दि. 27 जून पासून 24 तास दर्शन व्यवस्था उपलब्ध होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

 

आषाढी यात्रेच्या अनुषंगाने मंदिर समितीची बैठक सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथे संपन्न झाली. सदर बैठकीस मंदिर समितीचे सदस्य शकुंतलाताई नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ॲड. माधवीताई निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा तसेच पुरातत्व विभागाचे रामेश्वर निपाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीनिवास गुजरे, सर्व खाते प्रमुख, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे व जतन – संवर्धनाचे ठेकेदार उपस्थित होते.

शुद्ध आषाढी एकादशी दि. 06 जुलै रोजी आहे. यात्रेचा कालावधी दि.26 जून ते दि.10 जुलै असा आहे. शासकीय महापूजा 2.20 वाजता मा.मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य व मानाचे वारकरी यांचे शुभहस्ते सपत्नीक श्रीची शासकीय महापुजा केली जाणार आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन व संवर्धन आराखड्यांचा कामाचा आढावा घेण्यात आला, या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर जतन व संवर्धनाची सध्या सुरू असलेली सर्व कामे अंतिम टप्प्यात असून, टोकन दर्शन प्रणालीची दिनांक 15 जून रोजी पहिली चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

 

तसेच आषाढी यात्रेत भाविकांना सुलभ व जलद दर्शन उपलब्ध करून देण्यावर मंदिर समितीचा भर राहणार असून, दर्शनरांगेत बॅरीकेटींग करून वॉटरप्रुफ मंडप, 4+6 पत्राशेड, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, लाईव्ह दर्शन, कुलर फॅन, सार्वजनिक सूचना प्रणाली, मिनरल वॉटर, सुरक्षा रक्षक नियुक्ती, आपत्कालिन सुविधा, चहा खिचडी वाटप, आरोग्य व्यवस्थेचे स्टॉल, 24 तास अन्नछत्र, बँग स्कॅनर मशिन, हिरकणी कक्ष, नदीपात्रात चेंजिंग रूम इत्यादी स्वरूपाच्या सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्याबाबतची सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

 

प्रतिवर्षीप्रमाणे विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार देणे, टोकण दर्शनाची चाचणी घेणे इत्यादी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचे राज्याचे मुख्यमंत्री महोदय मा देवेंद्रजी फडणवीस यांना दिनांक 16 किंवा 17 जून रोजी मंदिर समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात येणार आहे. असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगीतले.

 

त्याचबरोबर चंदनउटी पुजेची दि. 13 जून रोजी सांगता पुजा होणार असून, श्री विठ्ठल व श्री रूक्मिणीमातेची चंदनउटी पुजा अनुक्रमे सदस्या ॲड माधवी निगडे व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तसेच सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे.

 

यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांना शनिरत्न व मानवसेवा जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव पारीत करण्यात आला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *