Zomato वरून आता काहीही मागवणं आणखी महाग; कंपनीच्या नव्या नियमांमुळं ग्राहकांच्या खिशाला फोडणी

Zomato Gold New Rules: कधीकाळी एका जागी बसून जेवण घरी मागवण्यासाठी थेट हॉटेलला फोन लावले जात होते. बऱ्याचदा तुमच्या भागात डिलीव्हरी देत नाही असं म्हणून कैक ग्राहकांच्या ऑर्डर नाकारण्यातही आल्या. हीच परिस्थिती सुधारली ती म्हणजे बहुविध फूड डिलीव्हरी अॅप्सनी. त्यातही विशेष लोकप्रिय ठरलं ते म्हणजे Zomato App. 

फूड डिलीवरी प्लेटफॉर्म Zomato नं सातत्यानं ग्राहकांसाठी काही कमाल ऑफर्स आणल्या. मात्र, आता हीच कंपनी खातेधारकांकडून नव्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या धर्तीवर जास्तीचे पैसे घेण्याच्या तयारीत दिसत आहे असं म्हणायला हरकत नाही. झोमॅटोनं नुकताच गोल्ड मेंबरशिप नियमांमध्ये काही बदल केले असून, फूड डिलीव्हरीवर वाढीव रक्कम घेण्याची तयारी केली आहे. 

16 मे पासून लागू झालेल्या नव्या नियमानुसार झोमॅटोला फूड डिलीव्हरी अॅपवर वाढीव रक्कम द्यावी लागणार आहे. सहसा झोमॅटो गोल्डधारकांना पावसाच्या दिवसांमध्ये सरचार्ज लावला जात नव्हता. मात्र आता ही सूट मिळणार नसून, कंपनीनं एका नोटीफिकेशनच्या माध्यमातून अॅप युजर्सना याची कल्पना दिली आहे. ’16 मे नंतर पावसाच्या दिवसांमध्ये फूड डिलीव्हरीवर सरचार्ज माफ केलं जाणार नसून ही सुविधा आता झोमॅटो गोल्ड बेनिफ्ट्समध्ये गणली जाणार नाही’, असं या नोटिफिकेशनमध्ये म्हटलं गेलं. 

झोमॅटोनं का थांबवली ही सुविधा? 

पावसाळी दिवसांमध्ये डिलीव्हरी पार्टनर्सना काम करणाना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये वाढीव रकमेच्या माध्यमातून कंपनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला देण्याचा मानस बाळगत आहे. म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला असून, सरचार्ज नेमका किती असेल याबाबतची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही. या निर्णयामुळं झोमॅटो हे अॅप वापरणाऱ्या आणि त्यातही झोमॅटो गोल्ड वापरणाऱ्यांना मात्र भुर्दंड सोसावा लागणार हे खरं. 

झोमॅटोनं एक सुविधा बंद केली असली तरीही काही सुविधा मिळणं मात्र सुरूच राहणार आहे. जिथं, 7 किमीच्या अंतरापर्यंत फ्री डिलीव्हरी, 30 टक्के रेस्तराँ डिस्काऊंट अशा सुविधांचा समावेश आहे. झोमॅटो गोल्डमध्ये काही निवडक पार्टनर रेस्तराँमध्य फ्री डिलीव्हरीचा फायदा युजर्सना घेता येतो. मात्र Domino’s सारख्या स्वत:ची डिलीव्हरी सर्विस देणाऱ्यांचा मात्र या यादीत समावेश नाही. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे झोमॅटोकडून सणावारांच्या दिवसांमध्येसुद्धा फूड डिलीव्हरीच्या नावाखाली जास्तीचे पैसे आकारले जातात. कंपनीच्या स्पष्टीकरणानुसार इतर काही गोष्टींसाठीचा खर्च या वाढीव रकमेतून केला जातो. एकिकडे कंपनीकडून हे धोरण लागू केलं जात असलं तरीही वाढणाऱ्या रकमेचा भार अॅप युजर्सना मात्र सहन होत नसून अनेकांनीच या अॅपसाठी पर्याय शोधण्यासही सुरूवात केली आहे हीच वस्तूस्थिती. 

Source

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *