Monsoon Updates : मान्सून अरबी समद्रात दाखल; कोकणमार्गे महाराष्ट्र कधी व्यापणार मोसमी वारे?

Monsoon Updates : होरपळवणाऱ्या उकाड्यापासून येत्या काही दिवसांतच मोठा दिलासा मिळणार असून, कारण ठरणार आहे ते म्हणजे मान्सून वाऱ्यांचं आगमन. अंदमानात दाखल झालेल्या या वाऱ्यांची सकारात्मकरित्या प्रगती झाली असून, अरबी समुद्रापर्यंत मोसमी वाऱ्यांनी मजर मारली आहे. त्यामुळं आता मान्सून खऱ्या अर्थानं केरळाच्या आणखी जवळ आल्याचं स्पष्ट होत आहे. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार मालदीव आणि श्रीलंकेपर्यंत मान्सून पोहोचला असून, तिथं अंदमान आणि बंगालच्या उपसागरात त्यानं चांगला जोर धरला आहे. ज्यामुळं 27 मेपर्यंत मान्सून केरळात धडकून तिथं स्थिरावणार आहे. यंदाच्या वर्षी अपेक्षित 13 मे पूर्वीच मान्सूनचे वारे अंदमान आणि निकोबार बेट समुहांमध्ये दाखल झाले असून, तिथून या वाऱ्यांनी बंगलच्या उपसागरापासून अरबी समुद्र आणि श्रीलंकेच्या कोमोरिनचं क्षेत्रसुद्धा व्यापलं. 

मान्सूनच्या प्रवासात वेग… 

केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पुढील चार आठवड्यात मोसमी वारे अर्थात पावसाचा प्रवास समाधानकारक वेगानं होणार असून, येत्या चार आठवड्यांत देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांची गती वाढणं अपेक्षित आहे. ज्यामुळं वेळेपूर्वीच मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाल्याच आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. 

मान्सूनच्या आगमनाचं एकंदर चक्र पाहिल्यास साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तो केरळमध्ये धडकतो आणि पुढं कोकण, मध्य महाराष्ट्र करत देशाच्या उर्वरित भागांना व्यापतो. यंदा केरळतच मान्सून वेळेआधी आला, तर तो महाराष्ट्राची वेसही वेळेआधीच म्हणजेच 6 जूनपूर्वीच ओलांडू शकतो असं म्हणायला हरकत नाही. 

हेसुद्धा वाचा : चक्रीवादळाचे संकेत पाहता मुंबई, रायगडसह ‘या’ भागात वादळी पावसाचा इशारा; काळेकुट्ट ढग दाटून येणार आणि…

दरम्यान, मान्सून दाखल होण्यापूर्वी देशातील बहुतांश भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. यामध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, रायलसीमा, तामिळनाडूचा समावेश आहे. तर, जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, मध्य प्रगेश, बिहार, आसाम आणि ओडिशामध्येसुद्धा पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. 

तिथं देशाच्या पूर्वोत्तर क्षेत्रापासून पश्चिम भारतापर्यंत चक्रीवादळी वाऱ्यांची निर्मिती होत असल्यानं या भागांमध्येसुद्धा वादळी पावसानं हजेरी लावली आहे. या वादळाच्या धर्तीवर पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू, कर्नाटक या भागांना अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. 

 

Source

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *