रिलायन्सकडून मुकेश अंबानी पगारात एक पैसाही घेत नाहीत; मग पत्नीसह त्यांच्या तिन्ही मुलांना किती मानधन मिळतं माहितीये?

Mukesh Ambani Business News : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) अध्यक्ष  असणाऱ्या मुकेश अंबानी यांनी त्यांच्या उद्योग क्षेत्रातील योगदानानं अनेकांपुढं आदर्श ठेवला. अनेकांना जाणून आश्चर्य वाटतं, पण गेली चार वर्षं ते या कंपनीतून पगार स्वरुपात एकही पैसा घेत नाहीत. 2020-21 पासून त्यांनी हा निर्णय घेतला. कोरोना काळापासूनच कंपनीच्या प्रगतीमध्ये भरीव हातभार लावण्याच्या हेतूनं त्यांनी हा निर्णय घेतला होता. 

उपलब्ध माहितीनुसार 2008 – 09 ते 2019-20 पर्यंत मुकेश अंबानी यांनी साधारण 15 कोटी रुपये इतका वार्षिक पगार घेतला होता. तेव्हापासून त्यांनी कघीच भत्ता किंवा रियायरल बेनिफिटही घेतलं नाही. नव्यानं समोर आलेल्या एका वार्षिक अहवालानुसार अंबानींनी 2023-2024 या वर्षातही पगार न घेण्याचा निर्णय घेतला होता, ज्या निर्णयाचं अनेक स्तरांतून कौतुक झालं. 

2002 पासून रिलायन्स समुहाच्या प्रगतीत मोलाचा वाटा 

जगातील 11 वे श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुकेश अंबानी यांनी 1977 मध्ये रिलायन्स समुहात वडिलांच्या निधनानंतर मोठी जबाबदारी स्वीकारली. मागच्याच वर्षी पुन्हा एकदा त्यांची समुहाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली असून, ते 2029 पर्यंत हे पद भूषवतील. आश्चर्याची बाब म्हणजे यादरम्यानही ते कंपनीकडून पगार स्वरुपात कोणतीही रक्कम घेणार नाहीयेत. असं असलं तरीही व्यावसायिक कारणास्तव होणारा प्रवास, बाहेरगावचा मुक्काम आणि फिरण्याचा खर्च यासोबतच कौटुंबीक सुरक्षिततेसाठी रिइंबर्समेंटचा अधिकार त्यांना प्राप्त असेल. 

अंबानी पगार घेत नसले तरीही बोर्डाच्या इतर सदस्यांच्या मानधनात वाढ 

एकिकडे मुकेश अंबानी यांनी पगार न घेण्याची भूमिका घेतली असली तरीही रिलायन्स उद्योग समुहाच्या व्यवस्थापकीय मंडळात अर्थात कंपनी बोर्डात असणाऱ्या सदस्यांच्या मानधनात मात्र मोठी वाढ करण्यात आली आहे. अंबानींचे बंधू निखील आणि हितस मेसवानी यांना 2023-24 या आर्थिक वर्षात 25.31कोटी आणि 25.42 कोटी इतकं मानधन मिळालं. तर, एग्‍झिक्‍यूटिव डायरेक्‍टर पी एम प्रसाद यांच्या मानधनाचा आकडा 13.50 कोटींहून थेट 17.93 कोटींवर पोहोचल्याचं पाहायला मिळालं. 

पत्नीसह तीन मुलांना किती मानधन मिळतं? 

उपलब्ध माहितीनुसार मुकेश अंबानी यांची पत्नी नीता 2023 पर्यंत कंपनीसाठी महत्त्वाच्या पदावर कार्यरत असून त्यांना 2023-24 मध्ये सिटींग फीस म्हणून 2 लाख रुपये आणि कमिशन स्वरुपात 97 लाख रुपये मिळाले. तर, मुकेश अंबानी यांची तिन्ही मुलं, आकाश, अनंत आणि ईशा मागील वर्षी कंपनी बोर्डात सहभागी झाली असून त्यांना सिटींग फीस 4 लाख रुपये आणि कमिशन म्हणून 97 लाख रुपये देण्यात आल्याची माहिती समोर आली. 

मुकेश अंबानी 109 अब्ज डॉलर इतक्या गडगंज श्रीमंतीसह जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 11 व्या स्थानी येतात. त्यांच्या कुटुंबाकडे या उद्योग समुहातील 50.33 टक्के भागिदारी असून, 2023-2024 मध्ये त्यांना कंपनीकडून 10 रुपये प्रति शेअरच्या हिशोबाने डिविडेंड स्वरुपात 3322.7 कोटी रुपये इतका नफा झाला. म्हणून आकड्यांचा हा खेळ डोळे दिपवणाराच आहे, नाही का?

Source

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *